दसऱ्याचा खरा गोडवा माणुसकीत; जीपीएस मित्र परिवाराने गरजूंचा दसरा केला गोड !
विजयादशमीला सामाजिक बांधिलकीचा संदेश; गरजू व निराधारांसाठी गोड भोजनाची व्यवस्था

पाळधी प्रतिनिधी दिनांक २० : विजयादशमी म्हणजे असत्यावर सत्याचा विजय, आपुलकी आणि आनंद वाटण्याचा सण! दसऱ्याला सोनं वाटण्याची परंपरा असली, तरी दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हेच खरे सोनं आहे. हाच विचार जपत गोरगरीब, गरजू आणि निराधारांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणाऱ्या जीपीएस मित्र परिवाराने विजयादशमीच्या निमित्ताने गोड भोजनाची व्यवस्था करून सणाचा आनंद साजरा केला.
भारतीय संस्कृतीत अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या जीपीएस मित्र परिवाराने यापूर्वीही गरजू कुटुंबे, निराधार आणि अडचणीत असलेल्या नागरिकांना विविध उपक्रमांतून आधार दिला आहे. त्याच सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय या उपक्रमातून पुन्हा आला.
सणाचा आनंद एकट्याने साजरा करण्यापेक्षा तो इतरांसोबत वाटण्यातच खरी संस्कृती आणि समाधान दडलेले आहे. हा संदेश देणाऱ्या या उपक्रमात युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह जीपीएस मित्र परिवारातील सदस्य सहभागी झाले.
दसऱ्याच्या निमित्ताने जपलेली ही आपुलकीची परंपरा समाजातील इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारी ठरेल.


