फुले मार्केटमधील क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाने घेतला मोकळा श्वास
अतिक्रमण हटल्याने फुले प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
जळगाव : शहरातील फुले मार्केट परिसरातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाभोवती झालेल्या अनाधिकृत अतिक्रमणामुळे अनेक वर्षांपासून स्मारकाचे दर्शन घेणे नागरिकांसाठी कठीण झाले होते. दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे स्मारक पूर्णपणे झाकले गेले होते. इतकेच नव्हे तर स्मारकापर्यंत जाण्यासाठी योग्य मार्गदेखील उरला नव्हता.
मात्र महापौर दीपमाला काळे यांनी पुढाकार घेत संपूर्ण फुले मार्केटमधील अतिक्रमण हटविल्यानंतर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाने अक्षरशः “मोकळा श्वास” घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्मारक पुन्हा खुले झाल्याने फुले प्रेमी व समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, हे स्मारक वर्षातून केवळ दोन दिवस — ११ एप्रिल महात्मा फुले जयंती आणि २८ नोव्हेंबर स्मृतिदिन — याच दिवशी मोकळे दिसत असल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. त्या दिवशी अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना तात्पुरता मार्ग तयार केला जात असे. मात्र आता कायमस्वरूपी अतिक्रमण हटल्याने समाजबांधवांमध्ये वेगळाच आनंद व्यक्त केला जात आहे.
या कारवाईमुळे महापौर दीपमाला काळे यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने वारसा जपल्याची भावना फुले प्रेमी व्यक्त करत आहेत. भविष्यात पुन्हा स्मारकाभोवती अतिक्रमण होऊ नये, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी युवक समता परिषद असेल किंवा माळी समाजातील तसेच बहुजन समाजातील विविध संघटनांनी व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले प्रेमींनी प्रशासनाकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. अखेर प्रशासनाने कारवाई केल्याने त्या मागणीला यश मिळाल्याचे मानले जात आहे. तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडूनही या कारवाईचे स्वागत करण्यात आले असून महापौर दीपमाला काळे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.



