ताज्या बातम्या

“एकही मतदार वंचित राहणार नाही!” – जीपीएस मित्रपरिवाराचा धडाकेबाज उपक्रम; मतदार मॅपिंग SIR कॅम्पला विक्रमी प्रतिसाद..!


पाळधी प्रतिनिधी –
मतदार हक्काकडे होणाऱ्या दुर्लक्षाला जोरदार चपराक देत “एकही मतदार वंचित राहू नये” हा ठाम निर्धार कृतीत उतरवत जीपीएस मित्रपरिवाराने राबवलेला मतदार मॅपिंग SIR कॅम्प गावात अक्षरशः जनजागृतीची लाट निर्माण करणारा ठरला. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा उपक्रम केवळ औपचारिक कॅम्प न ठरता एक सशक्त लोकचळवळ म्हणून उभा राहिला.
या कॅम्पमध्ये तब्बल २,५०० नागरिकांचे मतदार मॅपिंग पूर्ण करण्यात आले असून, ही संख्या गावाच्या इतिहासात विक्रमी ठरत आहे. अनेक वर्षांपासून प्रक्रियेच्या अभावामुळे किंवा दुर्लक्षामुळे मतदान हक्कापासून दूर राहिलेल्या नागरिकांना या उपक्रमामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकही मतदार वंचित राहणार नाही, यासाठी हा कॅम्प निर्णायक पाऊल मानला जात आहे.
विशेष म्हणजे, जीपीएस मित्रपरिवाराने केवळ कागदोपत्री कामावर समाधान न मानता घराघरात जाऊन प्रत्यक्ष जनसंपर्क साधला. मागील दोन-तीन दिवस गावभर दवंडी देत, गल्लीबोळांत फिरून नागरिकांना जागरूक केले गेले. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रभावी जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत प्रतापराव पाटील स्वतः मैदानात उतरून नागरिकांशी थेट संवाद साधताना दिसले, ज्यामुळे उपक्रमाला अधिक बळ मिळाले.
या संपूर्ण प्रक्रियेत बीएलओ, शिक्षक, उपशिक्षक तसेच इतर शासकीय कर्मचारी आणि बीएलए यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या उपक्रमामुळे केवळ मतदान प्रक्रिया सक्षम होणार नाही, तर नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी सुद्धा सुलभ झाली आहे. त्यामुळे गावात समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जीपीएस मित्रपरिवाराच्या कार्याचे सर्व स्तरांतून जोरदार कौतुक होत आहे.
“प्रत्येक मतदार सुरक्षित – प्रत्येक बूथ मजबूत” हा नारा आता प्रत्यक्षात उतरवण्यात जीपीएस मित्रपरिवार यशस्वी ठरला असून, भविष्यातही असेच लोकाभिमुख आणि परिणामकारक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button