“दुःखातही साथ” – सहवेदनेचा हात” जिपीएस मित्र परिवाराचा हृदयाला स्पर्श करणारा उपक्रम
पाळधीकरांच्या भावनांना स्पर्श करणारी संवेदनशील समाजसेवेची नवी दिशा

पाळधी / जळगाव प्रतिनिधी दि. 8 नोव्हेंबर – “समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे” हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत असलेला जिपीएस मित्र परिवार गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि मानवतावादी कार्यांद्वारे माणुसकीची उब जपण्याचे कार्य करत आहे. या सामाजिक प्रवासाला भावनिक स्पर्श देत त्यांनी नुकताच सुरू केलेला “दुःखातही साथ” हा उपक्रम पाळधीकरांच्या मनाला भिडला आहे.
थंडीच्या दिवसांत निराधारांना उबदार कपड्यांचे वाटप, रोज सुमारे २०० लोकांना मोफत भोजन, अपंग बांधवांना तीनचाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप, विद्यार्थी गुणगौरव आणि गुरुजन सन्मान सोहळे, संत भोजन तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठा कीर्तन सप्ताह अशा विविध उपक्रमांद्वारे या ग्रुपने समाजात सतत ठसा उमटवला आहे.
“दुःखातही साथ- सहवेदनेचा हात
पाळधी गावात जर कोणत्याही कुटुंबावर दुःखद प्रसंग आला, तर त्या परिवारासाठी २ मंडप, ४० खुर्च्या, ५ पाण्याचे जार, २ चहा थर्मास, चटया आणि भोजनपट्टी अशी सर्व आवश्यक सामुग्री जिपीएस मित्र परिवार विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे.
या उपक्रमामागील भावार्थ – “समोरच्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याला आधार देणे” हा आहे. या संवेदनशील विचाराने पाळधी गावात माणुसकीचा नवा धागा जुळला आहे.
स्मशानभूमी दत्तक व सौंदर्यनिर्मितीचा उपक्रम
मित्र परिवारातील एका सदस्याच्या स्मृतिदिनानिमित्त पाळधी स्मशानभूमी दत्तक घेऊन तिचे सुशोभीकरण व बगीचा निर्मितीचे कार्य सध्या सुरू आहे. या कामासाठी श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व उद्योगपती शरद काका कासट यांनी अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या स्वतः स्वखर्चाने उपलब्ध करून देण्याचे आणि त्यासाठी एक शेड उभारण्याचे वचन दिले आहे. त्यांच्या या संवेदनशील भावनेने संपूर्ण उपस्थित मंडळींचे डोळे पाणावले.
मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “जिपीएस मित्र परिवाराने सुरू केले कार्य हे ते केवळ समाजसेवा नाही तर माणुसकीची खरी साधना आहे. दुःखाच्या क्षणी कोणाच्यातरी खांद्याला हात देणे – हीच खरी श्रद्धांजली आणि हीच खरी सेवा. पाळधी सारख्या गावातून अशा भावनिक आणि आदर्श उपक्रमाची सुरुवात होणे, हे कौतुकास्पद असल्याचे त्यानी सांगितले.
या सेवाभावी कार्यकर्त्यांची होती उपस्थिती
या लोकार्पण सोहळ्यास जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, युवा उद्योजक विक्रम पाटील, तसेच शरद कोळी, कृष्णासा बिचवे, पंढरीनाथ ठाकूर, भिलाआप्पा रोकडे, अजीज मणियार, फुलपगारदादा देवरे, माजी सभापती संजय पाटील, सरपंच विजय पाटील, आणि पत्रकार बांधव महेश बाबा झंवर, संजू भैया देशमुख, गोपाळ सोनवणे, दीपक झंवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण महाजन यांनी केले. प्रास्ताविकात जि. प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, “जिपीएस” म्हणजे फक्त ‘ग्रुप ऑफ पीपल्स फॉर सोसायटी’ नव्हे, तर जीवाभावाच्या मित्रांचा स्पर्श करणारा परिवार, जो माणुसकीच्या धाग्याने समाजाला जोडत आहे. “दुःखातही साथ हा उपक्रम त्याच मैत्रीचा, त्याच करुणेचा जिवंत पुरावा आहे.



