मतदार यादी शुद्धीकरणातूनच विजयाचा मार्ग; बूथ बळकट करण्यावर भर – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाळधी – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्धीकरण (SIR) हे केवळ एक अभियान नसून संघटनात्मक ताकद वाढविण्याची सुवर्णसंधी आहे. “एकही हक्काचा मतदार वंचित राहू नये आणि एकही बनावट नाव शिल्लक राहू नये,” असा स्पष्ट संदेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील सुगोकी लॉन येथे आयोजित बीएलए प्रशिक्षण शिबिरात ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत सांगितले की, बूथ हा पक्षाचा कणा आहे. बूथ मजबूत असेल तर निवडणुकीत यश निश्चित होते. त्यामुळे प्रत्येक बीएलएने आपल्या बूथचा सखोल अभ्यास करून घराघरात जाऊन मतदारांची अचूक माहिती संकलित करावी. BLO सोबत सातत्याने समन्वय ठेवत नवीन मतदारांची नोंदणी करावी आणि चुकीच्या नोंदी तातडीने दुरुस्त कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
ते पुढे म्हणाले की, मतदार यादी ही ग्रामपातळीपासून राज्यस्तरापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीची विजयाची शिदोरी आहे. त्यामुळे या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक आहे. “जोपर्यंत प्रत्येक पात्र मतदाराची नोंद होत नाही, तोपर्यंत विश्रांती नाही,” असे ठाम आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या अभियानाला अधिक प्रभावी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून तालुकास्तरावर नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करत बीएलएंना प्रोत्साहनपर मानधन देण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी SIR अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत ते १०० टक्के यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज व्यक्त केली.
प्रशिक्षण शिबिरात SIR तज्ञ मार्गदर्शक प्रथमेश मोहोळ यांनी मतदार पडताळणीची प्रक्रिया, डिजिटल मॅपिंग तसेच बूथनिहाय नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन पवार यांनी मानले.
उपस्थिती उल्लेखनीय
शिबिराला तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, तालुका संघटक रवी चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख धीरेंद्र पुर्भे, उपसभापती विजय महाजन, शेतकी संघाचे गजानन पाटील, शरद पाटील यांच्यासह धरणगाव तालुक्यातील शिवसेनेचे बीएलए, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




