ताज्या बातम्या

गरजू मुलांसाठी धावून आले प्रतापराव पाटील; पाळधीत माणुसकीचा हृदयस्पर्शी प्रसंग

रात्रीच्या फेरफटक्यात दिसली मुलांची हालाखीची परिस्थिती; तात्काळ नवीन कपडे देत कुटुंबाला दिला आधार, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव


पाळधी (ता. धरणगाव) – समाजातील गोरगरीब व गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपणारे मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या माणुसकीपूर्ण कार्याची सध्या परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे. एका छोट्याशा प्रसंगातून त्यांनी गरजू कुटुंबाला मदतीचा हात देत खऱ्या अर्थाने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी दाखवून दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे रात्री सुमारे ८ वाजेच्या दरम्यान पाळधी गावात फेरफटका मारत असताना काही लहान मुले गावात फिरताना त्यांच्या निदर्शनास आली. त्या मुलांच्या अंगावर परिधान करण्यासाठी योग्य कपडे नसल्याचे पाहून त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवली आणि त्या मुलांना जवळ बोलावून त्यांची आपुलकीने विचारपूस केली.
यावेळी संवादादरम्यान समजले की त्या मुलांपैकी काहींचे वडील वारले असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ही परिस्थिती लक्षात घेत प्रतापराव पाटील यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. त्यांनी लगेच पाळधी येथील राठी कलेक्शन या दुकानातून त्या मुलांसाठी नवीन कपड्यांची खरेदी करून दिली.
याचबरोबर त्यांनी आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्याला त्या मुलांच्या घरी निरोप पाठवून त्यांच्या आईला बोलावून घेतले. त्या आईलाही नवीन साडी-चोळी देत त्यांनी त्या कुटुंबाला आर्थिक तसेच मानसिक आधार दिला. अचानक मिळालेल्या या मदतीमुळे त्या कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
प्रतापराव पाटील यांच्या या माणुसकीपूर्ण कृतीचे परिसरात सर्व स्तरांतून कौतुक होत असून नागरिकांनी त्यांच्या या कार्याचे मनापासून स्वागत केले आहे. समाजातील गरजू व्यक्तींप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि तत्परता हीच त्यांच्या लोकप्रियतेमागील खरी ताकद असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, “एक हात मदतीचा आणि एक हात मायेचा” ही संकल्पना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून ती समाजातील निराधार, वृद्ध आणि गरजू व्यक्तींना भावनिक आधार देणारी आहे. जीपीएस मित्र परिवारासारख्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनेक गरजू व्यक्तींना औषधोपचार, निवास आणि आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जात आहे.
या उपक्रमांमुळे समाजात माणुसकीची भावना अधिक दृढ होत असून परस्पर सहकार्याच्या माध्यमातून समाज अधिक सक्षम आणि संवेदनशील बनण्याचा संदेश दिला जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button