वाढत्या गुरे चोरीमुळे पाळधीतील कत्तलखान्याविरोधात संताप; गावकऱ्यांनी कारवाईची मागणी जोरात
वाढत्या गुरे चोरीमुळे पाळधीतील कत्तलखान्याविरोधात संताप; गावकऱ्यांनी कारवाईची मागणी जोरात
पाळधी (ता. धरणगाव) : येथील गुरे चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पाळधीत कार्यरत असलेला कत्तलखाना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. जनावरे चोरीला जाऊन गायब होत असल्याने त्यांचा संबंध कत्तलखान्याशी जोडला जात असून, तो तातडीने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून पाळधीत गुरे चोरीचे प्रकार वाढले आहेत. बळीराजाच्या घरासमोरील- घरामागील तसेच शेतातील गोठ्यांतून चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत दोरी कापून जनावरे पळवून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सलगपणे घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या संबंधी नागरिकांनी पाळधी पोलिस चौकीकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप एकाही प्रकरणाचा ठोस तपास झालेला नाही. “रात्री जनावरे गोठ्यातूनच गायब होतात, पण पोलिसांना काहीच सुगावा लागत नाही,” अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, गुरे चोरीच्या घटनांचा आणि कत्तलखान्याचा काहीतरी संबंध असू शकतो, असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. काही तरुणांनी थेट कत्तलखान्यात गेल्यानंतर स्वतः तपास करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना काही निष्कर्ष न लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनांमुळे कत्तलखान्याविरोधात संताप उसळलेला असून, पशुपालक संघटनांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “योग्य तपास झाला तर गुरे चोरीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे,” असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
गुरे चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी आता गावकऱ्यांकडून होत आहे.



