महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची सुविधा : ‘विपश्यना ध्यान शिबिरासाठी’ मिळणार 10 दिवसांची पगारी रजा

ऑनलाइन माळी साम्राज्य _ महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती समोर आली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, सरकारी कर्मचार्यांना वर्षातून एकदा विपश्यना ध्यान शिबिरात सहभागी होण्यासाठी विशेष पगारी रजा मिळणार आहे.
वित्त विभागाच्या 27 जून 2003 रोजीच्या शासन निर्णयानुसार, प्रत्येक कर्मचारीला किमान 10 दिवस आणि कमाल 14 दिवसांची, पूर्णपणे पगारी रजा मंजूर केली जाऊ शकते. ही रजा खास करून विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट, धम्मगिरी (इगतपुरी, नाशिक) येथे आयोजित ध्यान–धारणा शिबिरासाठी लागू आहे.
शासनाने नमूद केल्याप्रमाणे, ही रजा देण्यामागचा उद्देश कर्मचारी वर्गाचे मानसिक आरोग्य सुधारणे, तणाव कमी करणे आणि प्रशासनातील कार्यक्षमता वाढवणे हा आहे. सरकारी सेवेत सततचा ताण, निर्णयप्रक्रियेतील जबाबदारी आणि दैनंदिन कामाचा तणाव लक्षात घेता हे प्रशिक्षण कर्मचार्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे सरकारचे मत आहे.
विशेष म्हणजे,
या रजेसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही
परंतु रजा अर्जासोबत विपश्यना केंद्राने दिलेले प्रवेशपत्र अनिवार्य
ही रजा हक्काची नसून अनुज्ञेय स्वरूपाची आहे
तीन वर्षांत एकदाच, आणि संपूर्ण सेवाकाळात जास्तीत जास्त सहा वेळा ही रजा घेता येते
ध्यानशिबिरानंतर कर्मचारी अधिक उत्साहाने आणि तणावमुक्त अवस्थेत कामाला लागतील, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक विभागांतील कर्मचारी या सुविधेचा सकारात्मक प्रतिसाद देत असून, मोठ्या प्रमाणात या रजेचा लाभ घेत आहेत.




