लेट लतीफ’ कर्मचाऱ्यांचा सत्कार, आ. चंद्रकांत पाटील यांची अनोखी ‘गांधिगिरी’!

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-
पंचायत समितीच्या कार्यालयात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाचा प्रकार समोर येताच, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एक अनोखी आणि उपहासात्मक पद्धत अवलंबली. कालच केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी वेळेवर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकले होते. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली होती.
आज सकाळी कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले, पण कामकाजाच्या वेळेची शिस्त पुन्हा पाळली गेली नाही. कर्मचाऱ्यांची ड्युटी सकाळी १० वाजता सुरू असतांनाही बरेचसे कर्मचारी तब्बल साडेअकरा वाजता हजर झाले. यावेळी आ. चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विलंबाने हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.
आज 25 सप्टेंबर रोजी आमदार चंद्रकांत पाटील हे सकाळी दहा वाजेपासून ते साडेअकरा वाजेपर्यंत पंचायत समिती येथे बसून होते. यावेळी त्यांना आपण पंचायत समिती कार्यालयात का भेट दिली असे विचारले असता त्यांनी सांगितले की, काल मी मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना मला माहिती मिळाली की, पंचायत समिती कार्यालयात काहीतरी हालचाली व उलाढाली झाल्या तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आलेल्या होत्या त्यांनी गटविकास अधिकारी यांच्यावर आरोप केले होते. तर त्यांनी काय व कसे आरोप केले होते ते पाहण्यासाठी मी पंचायत समिती कार्यालयात आलो होतो पंचायत समितीला कुलूप लावल्यानंतर पंचायत समितीचा संपूर्ण कारभार बंद पडल्यावर सगळे अधिकारी बाहेर काढून कुलूप लावण्यात आले होते. या बातम्या मी आज पाहिल्या सकाळी मी पावणेदहा वाजता पंचायत समिती कार्यालयात आलो परंतु अकरा वाजेपर्यंत सुद्धा नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी हे आलेले नव्हते तसेच लेखी तक्रारी या ठिकाणी मला पाहायला मिळालेल्या नाहीत यासंदर्भात मुख्य अधिकारी यांच्याशी सुद्धा माझे भ्रमणध्वनी वरून बोलणे झाले पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या विविध शासकीय योजना महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारकडून योजना आलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पंचायत समितीचे आहे परंतु पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांचे टार्गेट कमी आले तसेच स्वच्छ भारत मिशनचे पैसे वर्षानुवर्षे येत नसून त्याची प्रशासकीय मान्यता देखील होत नाही आहे दलित वस्ती चे कामे ग्रामपंचायत पातळीवर आलेले आहेत त्याला फंड नसल्यामुळे या कामाची वर्क ऑर्डर होत नाही आहे या गोष्टीसाठी लोकप्रतिनिधींनी वरच्या पातळीवर भांडले पाहिजे काल जो कुलूप लावण्याचा नवीन पायंडा पडला तो इतका चांगला पायंडा पडला की तो वरिष्ठ नेत्यांनी केल्यामुळे उद्या चालून काहीही झाल्यास मी देखील कुलूप लावून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करेन तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी पंचायत समितीला कुलूप लावून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतील गटविकास अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले का पाठवले हे मला माहीत नाही आहे मी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मला संपूर्ण माहिती मिळत नाही आहे.
यावेळी आमदार पाटील यांना गटविकास अधिकारी व काही कर्मचारी साडेअकरा वाजेपर्यंत हजर नाहीत असे विचारले असता ते म्हणाले, त्यांचे काही होऊ शकत नाही कारण ते शिफारशीवर आलेले आहे नवीन रुजू झालेले गटविकास अधिकारी यांना काल सात वाजता ऑर्डर मिळाली असल्याने त्यांनी सकाळी साडेनऊ किंवा दहा वाजेपर्यंत हजर व्हायला पाहिजे होते परंतु मी कायदा मानणारा माणूस असल्याने मी या गोष्टीसाठी कुलूप लावणार नाही असे आमदार पाटील प्रसार माध्यमांना माहिती देते वेळी म्हणाले.
फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पगुच्छांचे स्वागत
आ. चंद्रकांत पाटील यांनी कार्यालयात उशिरा येणाऱ्या या ‘लेट लतीफ’ कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले. कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी केलेले हे उपहासात्मक कृत्य त्यांना ओशाळवणारे ठरले. उपस्थित लोकांच्या देखत झालेल्या या प्रकारामुळे संबंधित कर्मचारी वर्गाला आपल्या कर्तव्याच्या अनुषंगाने शिस्त पाळण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
गांधिगिरी’द्वारे दिला संदेश
आ. चंद्रकांत पाटील यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त आणि वेळेची महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी विनोदी पद्धतीने हा उपक्रम राबवला. त्यांची ही ‘गांधिगिरी’ संबंधित कर्मचाऱ्यांसाठी एक धडा ठरली असून, या घटनेनंतर कर्मचारी वेळेवर येण्याची अपेक्षा आहे.