थेट केंद्रीय मंत्रींनी ठोकले पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ! जाणून घ्या सविस्तर..

मुक्ताईनगर, प्रतिनिधी/मुक्ताईनगर तालुक्यातील पंचायत समिती विभागामार्फत मिळणाऱ्या विविध योजनांचे लाभ लाभार्थींना मिळत नसून ग्रामसभेतील मंजुरी यादी घेतली जात नसून घरकुले गोठा या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत पंचायत समितीमध्ये पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही असा गटविकास अधिकारी यांच्यावर आरोप करीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी 24 सप्टेंबर सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या गेटला कुलूप लावले यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी एक वाजता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बैठक आयोजित केलेली होती बैठकीमध्ये खासदार खडसे यांनी पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांना लाभ मिळत नसून त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करीत ग्रामसभेमध्ये ठराव झालेल्या मंजुरी याद्या प्रकरणे घेतली जात नसून जो पैसे देतो त्याचेच काम होते अशा प्रकारचा बाजार पंचायत समितीमध्ये चालू असून यामध्ये गटविकास अधिकारी व सर्व ऑपरेटर यांचे संगणमताने ही कामे होत असून याला कोणताही वचक किंवा वरिष्ठांचा धाक नसल्याचे दिसून येत असल्याचे खडसे यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी निशा जाधव या कुठल्याही प्रकारचे उत्तर देऊ शकले नाही तसेच त्या तक्रारींचे निवारण करत नाही तसेच ग्रामसेवक यांची दरमहा बैठक घेत नसल्याचेही खडसे यांनी सांगितले. याप्रकरणी महसूल विभागाचे अधिकारी एकनाथ डवले व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून खासदार रक्षा खडसे यांनी गटविकास अधिकारी निशा जाधव यांना निलंबित करा किंवा त्यांना जिल्हा परिषदेमध्ये जमा करा व मुक्ताईनगर येथे चांगले अधिकारी द्या असे सांगितले. जोपर्यंत गटविकास अधिकारी निशा जाधव यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा पवित्रा राज्यमंत्री खडसे यांनी घेतलेला आहे.
@@गट विकास अधिकारी दवाखान्यात… राज्यमंत्री यांच्या या कारवाईमुळे मुक्ताईनगर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी निशा जाधव यांचे ब्लड प्रेशर वाढल्याने त्यांना मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. पत्रकारांनी दवाखान्यामध्ये गटविकास अधिकारी जाधव यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की खासदार खडसे म्हणतात माझ्या घरी यायची तुम्हाला लाज वाटते का तसेच बैठकीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर मला अपमानास्पद वागणूक दिली. तसेच पंचायत समिती माझी आहे बाहेर निघा असेही त्या म्हणाल्या.
या प्रकरणाविषयी आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी केंद्रीय राज्य सत्तेमध्ये असताना मंत्री आंदोलन करताय सत्तेमध्ये असताना मग फायदा कोणाला होणार सत्तेला की विरोधकाला असा टोला त्यांनी हाणला तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी गट विकास अधिकारी यांची दवाखान्यामध्ये जात विचारपूस करीत तब्येतीची माहिती घेतली. आम्ही तुमच्यासोबत आहोत काही काळजी करू नका तसेच लोकांची कामे होण्यासाठी लावलेले पंचायत समितीला लावलेले कुलूप उघडा किंवा तोळा तसेच ते कुलूप उघडू देऊ नसल्यास त्यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करा असे आमदार पाटील यांनी गटविकास अधिकारी जाधव यांना सांगितले.
अधिकारी पोहचले मुक्ताईनगरात…. राज्यमंत्री खडसे यांनी पंचायत समितीला कुलूप लावल्यानंतर जळगाव येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राजू लोखंडे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग अनिकेत पाटील हे अधिकारी मुक्ताईनगर मध्ये पोहोचले. मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांनी राज्यमंत्री खडसे यांची भेट घेत माहिती जाणून घेतली तसेच दवाखान्यामध्ये उपचार घेत असलेल्या गटविकास अधिकारी जाधव यांची तब्येतीची विचारपूस त्यांनी केली .